भारतीय भाग्याच्या दोन आराध्यदेवता, आधारदेवता, या दोन देवतांची पूजा पुनरपि जोपर्यंत सुरू होणार नाही, तोपर्यंत तरणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गो-पूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहो. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो; परंतु तिला खायला प्यायला देत नाही; तिचे दूधही मिळत नाही; मिळाले तर रूचत नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणार्या ला नरक सांगितला आहे. दास्य सांगितले आहे.'
रात्र दहावी: पर्णकुटी
"मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई, सांग गं भाऊला मला घेऊन जायला. 'वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती.
'तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे?' भाऊ म्हणाला.
'ने रे तिलासुध्दा, तीही ऐकेल. चांगले असेल ते सार्यांहनी ऐकावे. मी सुध्दा आले असते; पण हे घरातले आवरता रात्र होते बाहेर.' भाऊची
तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का त्याच्या मनास ते लागले?
यशवंत वाचणार नाही, असे वाटले. नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. 'आई! मला ठेवा!' तो क्षीण आवाजात म्हणाला.
'माझ्याजवळच आहेस बाळ तू!' आई म्हणाली.
अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळयांत पाणी आले होते.
'आई, माझे डोके खाली ठेव हो. तुझी मांडी दुखेल. तुझे सांधे