आले असते.' भिका म्हणाला.
'मी काही नाटक नाही करीत; माझ्या हृदयातील बोल तुम्हांला सांगत आहे.' श्याम म्हणाला.
'आम्ही नाटक नाही म्हणत. परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो. रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत; परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावयास जात. रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत.' नामदेव म्हणाला.
'बरे असू दे दिवा. तुम्हाला ज्यात आनंद, त्यातच मला,' असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरूवात केली:
एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे लांब व रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहेळयाचे झाड होते. एकाएकी टप् असा आवाज झाला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला, ते पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले.
धापट वगैरे देण्यात आले. धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो. कांडपिणी निघून गेल्या.
शिवरामाने झाडांना पाणी घातले, गुरांची दुधे काढली. आईने गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरले होते. त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली, 'शिवराम, हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे. घरी काढा करा; त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या. मग पांघरूण