वर येऊन मी उडी टाकिली. बाळूने न धरिता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुखडी होत्या, म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला. पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोचवावयाला आली.
बन्या म्हणाला, 'श्यामची आई! श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली. मुळी भ्यायला नाही आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळूकाका म्हणाले, की 'श्याम लौकरच शिकेल चांगले पोहायला.'
'अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पूस. ती शेंडी पूस.' आई म्हणाली. मुले निघून गेली, मी डोके पुसले. सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावून बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आई जेवावयास बसली होती. मी ओसरीवर होतो. इतक्यात 'श्याम' अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, 'काय?' आई म्हणाली, 'ती दह्याची कोंढी घे. आत दही आहे चाटून टाक. तुला आवडते ना?'
मीही रागानेच म्हटले.
माझी बहीण माहेरी आलेली होती, ती मला म्हणाली, 'श्याम! ये तुला मी शिकविते. कठिण का आहे त्यात काही?'
"मला नको तू शिकवायला जा.' मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावीत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिध्द होते. आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावयाचे. चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही, वगैरे