म्हणाली, 'येईन हो. वेणू परवाच का जाणार? मला वाटले होते की, राहील संक्रांतीपर्यंत. मलासुध्दा तिची करमणूक होती. यायची, गाणी म्हणून दाखवायची.'
पार्वतीबाई म्हणाल्या, 'तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे! आली चार दिवस, पुष्कळ झाले. त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्षे झाली, तरी माहेरी पाठवीत नाहीत. तिची आई त्या दिवशी रडली हो. त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना? मग या हं उद्या. वेणूला तुम्हांला बोलवायला पाठवीन. जात्ये मी.'
आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसर्यान दिवशी दुपारची जेवणे झाली, परंतु आईला बरे वाटत नव्हते. उष्टी-खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारले, 'आई निजलीसशी?'
'श्याम! अंग दुखते आहे. जरा चेपतोस का?' आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लागलो. आईचे अंग कढत झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होते.
अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला! समुद्रमंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे.'
रात्र आठवी: क्षमेविषयी प्रार्थना
बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना, सारखी चोवीस तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी