ताप नव्हता हो. अंग जरा कणकण करीत होते एवढेच. श्याम! जा, बाळ, दिवा लाव, तिन्हीसांजा झाल्या.'
मी दिवा लावला व देवातुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते. ती गहिवरून म्हणाली, 'श्यामची आई! तुम्ही अंगात ताप असता वडया करावयास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वडया झाल्या तर नसत्या. आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वडया जास्त आहेत?'
माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, 'अगं, अशा एवढयाशा तापाने काय होते? वेणू, आम्हां बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे, तरी धुण्याची मोट घेऊन ती आम्ही धुऊन आणतो. दहा माणसांचा स्वयंपाक करितो. असे मनाला लावून नको घेऊ. अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन. जा आता तू घरी. आई तुझी वाट पाहत असेल.'
वेणू आईजवळ बसली. ती जाईना. मी वेणूस म्हटले, 'वेणूताई! त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे, तूच कर.'
म्हणे अनार्या, ये रथावरि झणी यदुराया, असा येता देखे, मारावे मजला, अंग वक्र अधरी धरि पावा, वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत घेत करून, तर अर्थही सांगावयाचे. 'सौमित्र म्हणजे कोण?' असे ते विचारीत. आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत. 'लक्ष्मणाची आई कोण?' आम्ही सांगावे 'सौमित्रा'. मग सौमित्र म्हणजे कोण?' आम्ही सांगावे अंदाजाने 'लक्ष्मण' भले शाबास! अशी मग ते शाबासकी