नाही तर खालून ओढेल.' आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला. दुसर्याे दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हां सर्वांना वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वडया मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणूसुध्दा जगली नाही; परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात; परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात.
रात्र पंधरावी: रघुपती राघव राजाराम
लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळया पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधुसंतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते. लहानसे मखर केले होते. त्याला बेगड वगैरे लावून ते सजविले होते. सुंदर शाळिग्राम या देवळात मी ठेविला होता. तो शाळिग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासप्रमाणे तो शाळिग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा, असे मला वाटे.
वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेने, डोळयांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला झालो नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे; परंतु