आम्ही त्या वेळेस फार मोठे नव्हतो. मराठी पाचवीत मी होतो. वय अकरा वर्षाचे होते नव्हते. परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्या वेळेस मी मोठा होतो. त्या वेळेस ना शंका, ना संशय. गोड श्रध्दाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करावयाचा. परमेश्वराचा जप करायचा, कार्तिकस्नान, माघस्नान, वैशाखस्नान वगैरे करावयाचा. कथासारामृत या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली, तर अमृत होते, असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले, अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले, 'मी पहाटे अंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन. मग तो उठेल. नाही का?'
आई हसली व म्हणाली, 'तू वेडा आहेस.'
त्या वेळीची ती भोळी श्रध्दा चांगली, की आजचा संशय चांगला, मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या. मी गोष्ट सांगणार आहे, ती निराळीच.
आले व थोडया वेळाने मी जेवावयास गेलो. कणेरांगोळया घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळयाचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठया हंडयांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही, याची चवकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळीपंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठविण्यात येई. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व 'हरहर महादेव' होऊन मंडळी जेवावयास