श्रीराम जयराम जयजयराम
असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो.
प्रभुसवे लढू आम्ही कुस्ती
प्रेमाची चढली मज मस्ती रे
प्रेमाची चढली मज मस्ती
आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्रीबोवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना. 'काय शिंची कार्टी!' असे कोणी म्हणू लागले. 'हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे-येथे पुराण चालले, समजू नये का?' पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे? त्यांनी बंद नको का करायला!' 'अहो, पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवितात.' अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो.
देवळातील मंडळीनी गुरवाला बोलाविले व त्याला ते म्हणाले, 'जा, रे, त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर. येथे पुराण चालले आहे.' परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते.
'बायक्या आहेस अगदी!' शेजारचे गोविंदभट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लख्ख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला, त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येई.
जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्यांने सुपारी, विडा खाऊ नये, अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे दोन प्रहरी शाळेला