आई आल्याचे आम्हांला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, 'श्याम!' तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले, टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती.
'काय झाले, आई?' मी विचारले.
'तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला-' आई रागाने बोलली.
'आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळिग्राम मला दिलास? बघ, कसा दिसतो आहे! छत्रीच्या पांढर्याी बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय?' मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरव आला व म्हणाला, 'श्याम, देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने.'
'आम्ही नाही बंद करणार जा. त्यांचे पुराण चालले आहे, तर आमचे भजन चालले आहे.' माझा एक मित्र म्हणाला.
सुट्टी होती. आईने विचारले, 'काय रे होते जेवावयाला? भाज्या कसल्या केल्या होत्या?' मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, 'श्लोक म्हटलास की नाही?'
आता काय उत्तर देणार? एका खोटयास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते. दृढमूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले, 'श्लोक म्हटला.'
आईने पुन्हा विचारले, 'कोणता म्हटलास?तो म्हटलेला लोकांना आवडला का?'
पुन्हा मी खोटे सांगितले की, 'नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे'