दहा-बारा गाडया एकदम निघणार होत्या. पालगड ते खेड व खेड ते चिपळूण असे मुक्काम करीत त्या गाडया जाणार होत्या. वाटेत रानात उतरावे, नदीकाठी मुक्काम करावा, पिठलेभात करावा, जेवावे व पुढे जावे, असे करीत मंडळी जाणार होती. अशा प्रवासात खूप मजा येते. मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही. सृष्टिमाईजवळ एक मिनिट उभे राहावे व जावे, त्यात काय आनंद! आईच्या मांडीवर लोळावे, तिच्याजवळ बसावे, खेळावे. यातील सुख, त्याचे वर्णन का करता येईल? निसर्गही आपली माताच. त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ? तिच्याजवळ घटका घटका राहू या. या बैलगाडयांच्या प्रवासात फार मौज असते. रात्रीच्या वेळी तर फारच आनंद. शांत वेळ असते. झाडांमधून वरचे तारे व चंद्र मधून मधून डोकावत असतात. बैलांच्या गळयांतील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो! आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा,
ताक करीत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता. माथ्यासुध्दा मोठा होता. आईने एकदम ताक करायचे थांबविले व ती म्हणाली, 'श्यामने काल श्लोक म्हटला नाही; मला मात्र खोटेच येऊन सांगितले की, म्हटला. परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होत्ये की, देवाच्या पाय पड व पुन्हा खोटे बोलणार नाही, असे म्हण; परंतु किती सांगितले तरी ऐकेनाच.'
वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले, 'होय का रे? ऊठ, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ