रूपये तुझ्याकरिता द्यावे लागतील. कोठून आणायचे, बाळ पैसे? आईबापांची आज्ञा हीच तुझी कृष्णा, हीच गंगा. पुंडलीक आईबापाचे पाय सोडून, समोर देव आला तरी उठला नाही. तो त्यांचे पाय चेपीत बसला. खरं ना?'
परंतु मी म्हटले, 'आई! ध्रुव तर आईबापांना सोडून गेला. पुराणात दोन्ही प्रकार आहेत. आई! पुढचे कोणी पाहिले आहे? चांगले करावयाचे मनात आले, की लगेच करावे. त्याला वेळ बघत बसू नये, असे त्या सत्यनारायणाच्या कथेत नाही का? आई, जाऊ का? तात्यांना सांगितले, तर ते मला फुकटसुध्दा नेतील. ते का पैसे मागतील?'
आई म्हणाली, 'अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा; परंतु असे आपण ओशाळवाणे जावे का? दुसर्याहवर बोजा घालावा का? दुसर्यां च्या जिवावर देवाची पूजा नाही करता येत. दुसर्यां नी लावलेल्या व वाढविलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य? स्वत: श्रमावे, स्वत: मिळवावे व देवाला अर्पण करावे. जायचे असेल, तर पायी जा. आहे ताकद?
आईच्या पायांवर डोके ठेवले. माझे कढत कढत अश्रू तिच्या पायांवर पडले. 'आई! मी चुकलो, मला क्षमा कर.' असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्यमूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले; परंतु स्वत:च्या भावना आवरून ती म्हणाली, 'देवाच्या पाया पड. पुन्हा खोटे बोलण्याची बुध्दी देऊ नकोस, असे त्याला प्रार्थून सांग.'
मी देवाजवळ उभा राहिलो. स्फुंदत स्फुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो.
वडिलांचा राग मावळला होता.