सारे गडी, सारे साहाय्य करणारे. आहे का ध्रुवाची श्रध्दा? त्याचा तो भाव? वेडा! हे काय? रडावयास काय झाले? अरे, आपण लहान माणसे. अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा हट्ट घेऊ नकोस.'
मला खूप वाईट वाटले. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती. गाडयांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू, अशा रीतीने आपण जावे, असे मनात येत होते. आपण दमू, थकू, आपणांस भूक लागेल, खायला काय?.. नाना शंका मनात येत होत्या; पाणी प्यावे व झाडाचा पाला ओरबाडून खावा, बकरी पानांवर जगते, आपण जगू. चिंचेची, करवंदीची कोवळी पाने खाऊ, असे मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली, ते कळलेही नाही. मी उठलो, तेव्हा सार्यास गाडया निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होतीच. मी पटकन परसाकडे, तोंड धुणे आटोपले. झटपट आंघोळ केली. संध्या केली. नमस्कार घातले. तुळशीला पाणी घातले. पाटी-दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो.
प्रेम होती तरी वेळप्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते. खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला, आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी; तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. ह्या बेढब व ऐदी गोळयाला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून एका कवितेत म्हटले आहे :-
करूनि माता अनुराग राग ।
विकासवीबाळ-मना-विभाग
फुले