व रडू लागलो. माझे रडणे आवरून मी आईला म्हटले, 'आई! मी तुझे ऐकले नाही. असा पळून गेलो, म्हणून तू रागावलीस होय? मास्तरांनी मारले, म्हणून नाही हो मी पळालो. तू नाही का एखादे वेळेस मारीत! म्हणून पळतो का मी? भाऊंना वाटले, की त्यासाठी मी पळालो. तू काल म्हणालीस, 'जायचे, तर पायी जा. आहे ताकद?' आई! मी पायी जाऊ पाहात होतो. परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत होतो. कोठे बाळ ध्रुव आणि कोठे तुझा शेंबडा श्याम! आई, तुझ्या श्यामवर रागावू नकोस. तुझा श्याम आततायी व हट्टी आहे. मनात येईल, ते तो करू बघतो. मग असा फसतो व रडतो. तू नाही ना रागावलीस? तुझे न ऐकता व तुला न सांगता पळून गेलो, म्हणून नाही ना रागावलीस? सांग, आई सांग. नाही म्हण.'
माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली, 'श्याम मी का रागावेन? मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून
असे.
कधी कधी बोलताना आई म्हणे, 'मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली. ज्या दिवसापासून गाईला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दु:ख, रोग, दारिद्रय, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या