घर बांधले जात होते. त्या वेळेस एक नेपाळी कस्तूरीविक्या तेथे कस्तूरी विकावयास आला. श्रीमंत व्यापार्यांने त्या कस्तूरीविक्यास भाव विचारला. तो कस्तूरीविक्या तिरस्काराने म्हणाला, 'तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तूरी? पुण्याला जाऊन काही खपली, तर पाहावयाचे !' त्या श्रीमंत व्यापार्यातस राग आला. तो म्हणाला, 'तुझी सारी कस्तूरी मोज. त्या मातीच्या गार्यातत मिसळून देतो. कस्तूरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे, उत्तरेस जाऊन सांग.' त्या व्यापार्यााने सारी कस्तूरी खरेदी केली व गार्याात मिसळून दिली. वर्हा डातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तूरीचा वास येतो, असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या, त्या वेळेस कोणी रे, तिथे कस्तूरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध ! तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला? हा रंग कोणी दिला, सांग.
श्यामच्याने आता राहवेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, 'माझ्या आईचे हे देणे.
मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात.
मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला. त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात, असे नाही; आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव-निर्जीव सृष्टी शिकवीत असते;