'म्हणजे सर्वांना मारता येईल. सगळयांना झोडपून काढीन! मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे, बघा. म्हणूनच शाळा म्हणजे सासुरवास वाटतो. शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे. मी कोठे तरी बहकत चाललो, असे म्हणाल; परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी. साधी माणुसकी आमच्यात नसावी! पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यांवरही प्रेम करावयास शिकविणारी माझी थोर संस्कृती- त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत. साधी माणुसकीही कसे विसरले आहेत. हे पाहून हृदय जळते, पिळवटून येते, परंतु जाऊ दे.
दुपारची जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारी जणे बसलो होतो. ताम्हनात थंड पाणी घालून ते ताम्हन अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते. खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या? कोठले कोलन वॉटर? आई ताम्हन धरून बसली होती. सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती. माझ्या आईच्या काय मनात एकदम आले, कोणास माहीत.
पिलाचे लक्ष नव्हते. मी आईला म्हटले, 'आई! हे पिलू बघ ग कसे करते आहे! अगदी मान वर करीत नाही. त्याला काय खावयास देऊ?'
आई बाहेर आली. तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली, 'श्याम! हे जगणार नाही, हो. त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका. त्याला वेदना होतात. फारच उंचावरून पडले; गरीब बिचारे!' असे म्हणून आईने ते पिलू खाली कापसावर ठेविले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली. आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो. शेवटी चोच वासून ते मरून