गडयांनो ! माझ्यात जे काही चांगले आहे, ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरू, आई माझी कल्पतरू, तिने मला काय काय तरी दिले ! तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले ! प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. मनुष्यावर नव्हे, तर गाईगुरांवर, फुलांपाखरांवर, झाडामाडांवर, प्रेम करावयास तिनेच शिकविले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे, हे मला तिनेच शिकविले. कोंडयाचा मांडा करून कसा खावा व दारिद्रयातही स्वत्व व सत्त्व न गमविता कसे राहावे, हे तिनेच मला शिकविले. आईने जे शिकविले, त्याचा परार्धांशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केंव्हा बाहेर येईल, तो येवो. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो,
"मदंतरंगी करूनी निवास सुवास
परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे, हे आईबापच शिकवितात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला; आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला; जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्याच सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो; आईजवळ रडतो; आईजवळ खातोपितो; आईजवळ खेळतो-खिदळतो, झोपतो, झोपी जातो, आईजवळ त्याची ऊठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय.
आई