लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते, असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे, या जंगलातून वाघबीघ तर नाही येणार! मी त्या वेळेस बारातेरा वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली, म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोडविहीर होती. म्हणजे घोडयांना आत उतरून जाता येईल. अशा मोठमोठया पायर्याि त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच! मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल, म्हणून झपझप पावले टाकीत चाललो.
शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली, तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल, त्याच्या कपाळाला लावावयाची!
मला असे वाटले, की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळयातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर! भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो.
'नाही रे येथे, तो का येथे लपून बसेल अडचणीत?' एक जण म्हणाला.
'चला आपण जाऊ; उशीर होईल मागून.' दुसरा म्हणाला.
इतक्यात भास्कर म्हणाला, 'अरे, तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे. श्यामच तो!' सारे पाहू लागले.
'श्याम! चल ना रे, असा काय लपून बसतोस?' सारे म्हणाले.
'आहे ना