भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील; परंतु त्या रात्री ते जे दही दिले, त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती ती पैशाअडक्यात नव्हती.
आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली; परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती.
कृष्ण यशोदेचा बाळ। सुकुमार लडिवाळ
कृष्ण यशोदेचा तान्हा। त्यास पाजी प्रेमपान्हा
कृष्ण बाळ मेघश्याम। यशोदेचे प्राशी प्रेम
मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजीत होती, मला प्रेमपान्हा पाजीत होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. 'आई, तू मला कुशीत घेऊन निजव. तुझी चौघडी घाल. चल, मला निजव; थोडा वेळ थोपट. राहू दे पोतेरे.' मुलापुढे आईचे काय चालणार? मी जणू त्या वेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या.
'भित्रा! वेणू, तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारील.' वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा करून उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले.
मी ओरडलो, 'मेलो-आई ग, मेलो.'
पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळयाला मी मिठी मारू लागलो. ते मिठी मारू देत ना.
'आडवा हो अस्सा. पोट पाण्याला लाव व लांब हो. हात हलव.' मला पोहण्याचे धडे मिळू लागले.
बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरिले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला.