आईने, माझे धोतर फाटले होते. ते ठिगळ लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतई केली होती. ती आम्ही प्यालो.
पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेविला होता. उडदाचा पापड व मेतकूट तिने वाढले. भातात दोन तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात, म्हणून शेजारच्या जानकीवयनींनी ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. 'आता संक्रांतीस ये, हो. पाय फार दुखत असले, तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी. द्यावे दोन आणे आणि यावे. जप हो.' असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. 'श्याम! मी बोललो, म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ. नीट वाग. अभ्यास कर.' ते म्हणाले. नंतर मी दोघां धाकटया भावांस कुरवाळून निघालो. महारवाडयापर्यंत वडील पोचवावयास आले. पुढेही बेहळयापर्यंत आले. आमची
पुढे करावयाचा? तू त्या डोंगर्यांनकडचा ना? माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाहीत? त्यांना आमची कीव आली. जगात दुसर्या्ने आपली कीव करावी याहून करुणास्पद व दु:खप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार त्या वेळी आले ती बोलेना. शून्य दृष्टीने पाहत राहिली.
'आई, घे ना ग पैसे. मी काही चोरून नाही हो आणले,' मी काकुळतीस येऊन म्हटले.
आई म्हणाली, 'श्याम! आपण गरीब असलो, तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते,