'पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे म्हणून त्या काळया कृष्णाबरोबर पाठविले.' आईने सांगितले.
'केव्हा आला काळा कृष्णा?' त्यांनी विचारले.
'झाले दोन दिवस.' आई म्हणाली.
'तुझे लुगडे फाटले आहे, त्याला ते झाले असते. तुझ्या भावाने पाठविलेली ओवाळणी-तुझा त्यावर हक्क. ते आम्हांला घ्यावयाचा हक्क नाही.' भाऊ म्हणाले.
'तुम्ही व मी निराळी का आहोत? इतकी वर्षे एके ठिकाणी संसार केला; सुखदु:खे पाहिली, नाना बरेवाईट अनुभव घेतले; अजून का आपण निराळी आहोत? माझे सारे तुमचेच आहे व तुमचे ते माझेच आहे. आहे तरी काय आपणांजवळ? तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसल्यासारखे आहे. त्यातच माझा आनंद आहे. नेसा, मी त्याला कुंकवाचे बोट लावले आहे.' आई म्हणाली.
'मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे, याचे मला नाही का वाईट वाटणार? तुला आनंद होत आहे; परंतु मला दु:ख होत आहे! तू आपल्याला आनंद मिळविलास आणि मला?' त्यांच्याने बोलवेना.
आई म्हणाली, 'वेण्ये, वेडयासारखे काय बोलतेस? तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा, तशीच तू. वडया चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेविली असती, तर तुला किती वाईट वाटले असते? माहेरच्या माणसांस नावे ठेविलेली ऐकून तुझ्या डोळयांना पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत, म्हणून मी आल्ये. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी. त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली, म्हणून काय झाले? तुला श्याम परका वाटत नाही, तशीच मला तू वाटत नाहीस. मला त्रास का