मला म्हणाली, 'श्याम, अरे, खरेच असेल ते. देवावर ज्यांची श्रध्दा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात, त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस, ती देवानेच पाठविली. मे महिना आला, की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो. अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो. कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईच्या रूपाने.'
'आई, मला भेटेल का, गं, देव?' मी एकदम विचारले.
'पुण्यवंताला भेटतो. पुष्कळ पुण्य करावे. सर्वांच्या उपयोगी पडावे. म्हणजे देव भेटतो.' आई म्हणाली.
जानकीवयनी मला म्हणाल्या, 'श्याम, का बोवा वगैरे व्हायचे आहे की काय; मग शिकतो आहेस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर. आईला नोकरीवर ने.'
मी म्हटले, 'मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावे असे वाटते. आई! ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता. मी बसलो, तर मला भेटेल का देव?'
कधी आम्ही कथाकीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्ये थोडीच होती ! घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई.
विठोबाला वाहिली फुले । भजन करिती लहान मुले ।
विठोबाला वाहिली माळ । भजन करिती लहान बाळ ॥
वगैरे किती तरी भजने म्हणत आम्ही नाचत असू. भक्तिविजयातील निरनिराळया प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू.
गजेंद्राची ऐकून करूणा । सत्सर पावलासी, जगज्जीवना