तरी हरकत नाही. परंतु गरीब असला, तर तो ठरवितो, की १०८ अदपाव देईन; १०८ पावशेर देईन किंवा एकदम १। मण गूळ, १। मण तेल असेही देतात. त्यात वाटेल तसे १०८ भाग बसवावे.'
मी विचारले, 'आई ! तू १०८ अदपाव गूळ घातलेस तर?'
आई म्हणाली, 'श्याम! घरात विष खावयास दिडकी नाही, गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही. कोठून आणावयाचे पैसे? झाड का आहे आपल्या अंगणात? हलविले की पडले पैसे! आपण गरीब आहोत, श्याम!'
मी म्हटले, '१०८ आवळे घातलेस, तर?'
'बाळ! १०८ आवळे एकदा मी घातले होते, सोवलीहून त्यांनी आणले होते. आपला सोवलीचा तुकाराम नव्हता का, त्याने दिले होते.' आई म्हणाली.
आई! १०८ चिंचोके घातले, तर नाही का चालणार?' मी हसत हसत विचारले.
आई म्हणाली, 'हो, चालतील तर काय झालं! पण...'
'पण काय लोक हसतील, होय
देवळातील मंडळीनी गुरवाला बोलाविले व त्याला ते म्हणाले, 'जा, रे, त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर. येथे पुराण चालले आहे.' परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते.
आई आल्याचे आम्हांला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, 'श्याम!' तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले, टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती.