त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले. तर आपण महारमांग ठरू. श्याम! महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी. कारण समाजात राहावयाचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून, ते पापी आहेत, त्यांचा स्पर्श झाला, म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत.'
'खरे पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे, असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळविणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही, आई?' मी विचारले.
'श्याम! आपले ते विठनाककडे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारे माहीत आहे. काही तरी पूर्वी अदमण गल्ला दिला होता. त्याची सवाई-दिडी करून ते शेत आपण मिळविले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणांला खाली मान घालून उभे राहावे लागेल, हो!' आई खिन्न होऊन म्हणाली.
चालत जाणे म्हणजे त्यांना लाजविणे. ते मग मला गाडीत घेतीलच. त्यांना तर मी पायी येत आहे, हे कळता कामा नये. परंतु त्यांची सोबत तर हवी आणि पुन्हा इतके चाळीस-पन्नास कोस माझ्याने चालवेल तरी कसे?'
'आई म्हणाली, 'ध्रुवाच्या गप्पाच सांग. ध्रुवाला भीती वाटली नाही. जो देवाकडे जावयास निघाला, त्याला कोणाची आली आहे भीती? साप-वाघ त्याला मार्ग दाखवितील. खाणार नाहीत. तो दमून जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवडसा पडला, तर साप त्याच्यावर फणा धरील. त्याला तहान लागली, तर