आई पानग्या करावयास बसली. कढत कढत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते. त्यामुळे फारच छान लागत होती. 'अरे, पहाटे तुळशीला नैवेद्य दाखविलेली लोणीसाखर तेथे शिंपीत असेल, ती घ्या!' आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणीसाखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे. दादाने कांदेपाक आणला व पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली, 'श्याम, उद्या नको हो मागू. तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको, हो. पडायला. ऐकलेस ना, श्याम? आता शहाणा हो.'
मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही. दादाने मला विटीदांडू खेळावयास बोलविले. मी गेलो नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणांनी खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारीत होता. तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, 'दादा! त्या झाडांना का दुखवतोस? त्यांच्या आंगातून रक्त काढतोस?'
परंतु किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाजलज्जा सोडली. स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरे दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते. आत हृदय जळत होते. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते. इतक्यात माझे मनगट कोणी तरी धरले! 'अरे आहेस तरी तू कोठे? तुला शोधायचे तरी किती? गळयाला फास लावायचास एखाद्या वेळी!' असे शब्द माझ्या कानी