माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तास जाऊ लागला, तसतसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला. रात्रीची जेवणे झाली. आईचे उष्टेशेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळयात तुळशीवर एका मडक्यात लहान भोक पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येताजाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पणती लावलेली होती. परंतु अंगणात दिव्याची जरूरी नव्हती. सुंदर चांदणे पडलेले होते. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरूषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो! दूर्वांची आजी, आईसुध्दा बसल्या होत्या. शेजारच्या जानकीवयनीसुध्दा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपडया पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हटले, 'आई! तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला
परंतु वडील म्हणाले, 'पुन्हा लावणार नाही. परंतु आधी सापडू दे तर खरा!'
घरात जेवणे तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो, अशी शंका आली; परंतु तिने ती बोलून दाखविली नाही. तिला ते शक्य वाटले नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणिले. रस्त्यात मुलांची गर्दी. चोराला पाहावयास जसे लोक जमतात, तसे मला पाहावयास मुलगे जमले. वाटेत वडीलही भेटले. 'जा रे आपापल्या घरी. का तमाशा आहे?' वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली.
वडील