भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदयमंदिरातील सत्यदृष्टी दाखवीत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. ह्या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते, तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्त्वाची, जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे.
सहा कोस वडील चालून आले, का आले? तो खर्वस ती एक खर्वसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते. खरे प्रेम तेच, ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात! हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वत:च्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खर्वस दिला असता तर?
पाच-सहा दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल, तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे, तुला मारीन, नाही तर चालता हो.'
आई माझ्याकडे वळून म्हणाली, 'होय का रे श्याम? असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का? तूच चारदा त्यांच्याकडे जाशील.'
मी रागातच म्हटले, 'तो मला मुद्दाम हिणवायला येतो. 'तुला कोठे येते रामरक्षा?' असे मला हिणवीत तो म्हणाला. विचार त्याला, त्याने असे म्हटले की नाही ते. जसा अगदी साळसूद. स्वत:चे काही सांगत नाही. खोटारडा कुठला.'
आई म्हणाली, 'मला