वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारे जण 'अहं वेद' असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे. 'अहं!' सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आढयता, आपली अब्रू, सारे आपलेच.' आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वत:स विसरू शकत नाही, तो काय प्रेम करणार?
वडील म्हणाले, 'श्याम! तुझ्या आईने तुला खर्वस पाठविला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या.' त्यांनी खर्वसाची बोगणी मजजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, 'श्याम! अरे, बघत काय बसलास? टाक उरकून! लाजायला काय झाले? या, रे मुलांनो!
भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यावयाची, असे मी ठरविले. मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली. लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहात बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही, म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दांत म्हटले, 'भीमाताई! भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यावयाला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे. मला पाठ करावयाची आहे. आज सुट्टी आहे. मी सबंध दिवसभर लिहून काढीन.'