तुम्हीही घ्या. श्यामला एकटयाने खावयाला लाज वाटत असेल. एकटयाने नाही तरी नयेच खाऊ. चारचौघांना द्यावे.' इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांडयाचे फडके सोडले. 'ये रे श्याम! या रे आपण फन्ना करू. फडशा पाडू.' असे तो म्हणाला. आम्ही सारे खर्वसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खर्वस घेतला नाही. आम्ही देत होतो, तर म्हणाले, 'तुम्हीच खा. मुलांनीच खाण्यात गंमत आहे.'
आम्ही सारा खर्वस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घण घण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, 'झाला, रे, खाऊन? आण ते भांडे. मी नदीवर घासून घेईन.' ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, 'अभ्यास नीट कर, हो. प्रकृतीस जप. गाईचे वासरू चांगले आहे. पाडा झाला आहे.' असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो.
भीमाताईंनी भास्करला हाक मारिली व त्या म्हणाल्या, 'भास्कर! श्याम एवढा मागतो आहे, तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक. तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम! शाईचे डाग वगैरे नको, हो, पाडू. नीट जपून वापर. दे रे त्याला.' भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, 'आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक. माझे पाठ करावयाचे राहील.'
भीमाताई भास्करवर रागावल्या, 'तुझे अगदी आजच अडले आहे, नाही का रे? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारचा