आपणही रामाच्या सेतूस मदत करावी. हा सेतू बांधणे पवित्र आहे. रावणाला दूर करणे हे सगळया जगाच्या हितासाठी होते. त्यामुळे सार्यास जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते. ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे व वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिटकत, तिच्या केसात अडकत, ते सेतूजवळ आणून ती टाकी तेथे जाऊन अंग झाडी व ते कण पडत. तिला शक्ती होती, त्याप्रमाणे ती काम करीत होती. तुला हंडा उचलत नसेल, तर कळशी घे. कळशीने दमलास, तर तांब्या आण. त्यानेही दमलास, तर फुलपात्र ने, जा, शाम? किती रे सांगायचे?' आई मला समजावून सांगत होती.
शेवटी मी उठलो. लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती, शंकराला कोंडीत होती, पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते. पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती. मी त्यांच्यांत मिसळलो.
त्यांनी विचारिले, 'काय, श्याम! परवचा, स्तोत्र वगैरे झाले का सारे?
मी एकदम म्हटले, 'हो, सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का?
ते एकदम म्हणाले, 'तू कधी शिकलास? आणि कोणी शिकविली?'
मी सांगितले, 'भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली.'
'बघू दे तुझी रामरक्षेची वही,' ते कौतुकाने म्हणाले.
मी माझी वही त्यांच्यापुढे ठेविली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. डाग कोठे नव्हता, परंतु अक्षर किरटे होते.
वडील म्हणाले, 'शाबास अक्षर नीट आहे; परंतु जरा लांबट काढावे. असे बुटके काढू नये. म्हण पाहू आता.'