'अण्णा आला, आई अण्णा!' धाकटया भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले.
'इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना?' आई विचारू लागली.
'सोंडेघरच्या पर्ह्यााला पाणी नव्हते का रे?' वडिलांनी विचारले.
'हो! परंतु मी आलो कसातरी?' मी म्हटले.
'त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून!' वडील म्हणाले.
'गणपतीची कृपा. बरे, ते कपडे काढ. कढत पाण्याने आंघोळ कर.' आई म्हणाली.
मी आंघोळीस गेलो. धाकटया भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते, की काही तरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो.
परंतु माझ्या भावास त्या गाठोडयात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट! तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते! ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती.
बरे, आईला वाईट वाटू नये, म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणार्यालचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी.
मित्रांनो! दुसर्यागचे मन दुखवू नये. म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजीही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ, का अळणी भाजी कशी हातून झाली, का रे, तुम्ही कोणी सांगितले नाही, असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही, म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी, माझी आई श्रेष्ठ?