केळी अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळीपोफळीचे-नारळींचे आगर. मोठा सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृध्द मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेचचेल, दाट झाडी.
आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हांस माहीत नव्हते. विचारीत विचारीत चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते
सुभाताईचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते. आईने सुध्दा किती तरी दिवसांनी तिला पाहिले. माझी आई सुभाताईपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठया मुलीसारखी सुभाताई शोभत होती.
आईला एकदम पाहताच चकितच झाली. 'वयनी! ये. किती ग वर्षांनी आपण
माझ्या आईने करावे तरी काय? कांडण मोजून घ्यावे, का दिवा लावावा आणि देवातुळशीस दाखवावा, का गुरे बांधावी, का धार काढावी, का काढा करावा. का भाजीभात करावा. का रंगूला खेळवावे, का अक्काजवळ बसावे? तिला काय हजार हात होते? आई! धन्य आहे तुझी. स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच. त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या. भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृतीला एक भूमातेचीच उपमा शोभेल, दुसरी नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात, ती मला राउळे, देवाची मंदिरेच वाटतात. त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो. दुसरी देवळे मला माहीत नाहीत.