ते म्हणाले, 'देवाचा चमत्कार; दुसरे काय?'
आई म्हणाली, 'येथे देवाने राक्षसास मारले असेल, म्हणून हे पाणी लाल झाले!' सुभाताईचे यजमान म्हणाले, 'हो! तसा तर्क करावयास हरकत नाही.'
लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोडया जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुऊ लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत हसत खेळत-खिदळत येत होता. पायांखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपासमुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते, तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने मलाही प्यावयास लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळदकुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली; चार आणे समुद्रात फेकून दिले! मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईने चार आणे
काय कामाचे? आपला काडीचाही उपयोग नाही, आपले जीवन म्हणजे सर्वांना भार! सर्वांना त्यापासून त्रास, असे मला त्या दिवशी वाटले. माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली. निराळी दिशा दिसू लागली. कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात, ते खोटे नाही. मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणार्याण तार्यां कडे बघत प्रार्थना केली, 'देवा! आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन. माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो. मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर!'
त्या दिवसापासून