दिले! ती कृतज्ञता होती. चंद्रसूर्य निर्माण करणार्याु देवाला भक्त काडवातीने, निरांजनाने ओवाळतो. स्वत:च्या अंत:करणातील कृतज्ञता व भक्ती काही तरी बाह्य चिन्हात प्रकट करावयास मनुष्य पाहात असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुध्दी नको का शिकावयाला?
कोरडे नेसून पुन्हा आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली, तो बारा वाजावयास आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाने वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानांचे स्नानसंध्या, देवतार्चन, पहाटेच होत असे. पहाटे सारे करून मग ते बागेच्या, आगराच्या कामाला लागत असत.
आम्ही जेवावयास बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रूचकर होते. सुभाताईने तेवढयातल्या तेवढयात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान्न केले होते. नारळाचा आंगरस काढला होता; नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रूची आली होती. वांगी व त्यात मुळयाच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकढे तूप होते.
अक्काला गुण पडत चालला, एवढे खरे. माझी अक्का चांगली बरी झाली. ती शरीराने बरी झाली, मी मनाने बरा झालो. दोघांचे पुनर्जन्म झाले. अक्काला नवीन शरीर मिळाले मला नवीन हृदय मिळाले!
रात्र विसावी: सात्त्विक प्रेमाची भूक
"काय, सुरूवात करू ना, रे, गोविंदा?' श्यामने विचारले. 'थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते.' गोविंदा म्हणाला.
"इतके काय असे आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले.' श्याम म्हणाला.