ओल्या पोफळातील सुपारी सुभाताईने आईला दिली. मी सुपारी खात नसे; परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई या दोघींनी आवराआवर केली. दोघी जणींनी जरा अंग टाकले व दोघीजणी बोलत होत्या. सुभाताईंच्या मुलग्याबरोबर मी आगरात गेलो. आगरातील मजा पाहात होतो. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात. परंतु फार असले, म्हणजे त्यांना कोण विचारतो! केळफुलाची एकेक पारी उघडत होती व केळयाची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते. त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरू पोपटाने टोचला होता. आम्ही तो पाडला व खाल्ला. इतक्यात सुभाताईने हाक मारली, म्हणून मी घरात गेलो व मधूही पाठोपाठ धावत आला.
'श्याम! त्या पपनशीवरची दोन-तीन पपनसे तोडून आण. दोन येथे फोडू व एक बरोबर घेऊन जा, गाडीत खायला होईल.' सुभाताईने सांगितले.
'श्याम, कर सुरूवात आता.' राजा म्हणाला.
सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली.
मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून सहा कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे. तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो. परंतु वडिलांनी इंग्रजी शिकविण्याचे ठरविले. एक-दोन यत्तांइतके माझे शिक्षण झालेले होते.
दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र चार कोस दूर