पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या-भागलेल्या सूर्याला सहस्त्र तरंगांनी स्नान घालावयास उत्सुक होता. बुडाला, सूर्य बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला, त्या वेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसर्यास दिवशी परत येणारा होता.
दोन्हीकडे किर्र झाडी लागली. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फारच गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. मायलेकरे गाडीत बोलू लागली.
'आई! पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा बरे कोठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई! तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे, असे वाटते.' मी आईचा हात हातात घेऊन म्हटले.
आई म्हणाली, 'तुम्ही मोठे व्हा व मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका, सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले
खिन्न व दु:खी होतो. जणू मला जगात कोणी नाही, असे त्या दिवशी वाटत होते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते, की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात? हा विचार मनात घेऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गदित व्हावे, असे अनुभव मला आले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू! कोणा झाडाचे पान! क्षणात वाळून जाणार, पडून जाणार! असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूतीं