म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरूषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव प्याले. आई घरात जेवावयास बसली.
'मग काय, भाऊराव! व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज पंचाहत्तर रूपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. खेप फुकट दवडू नका. तुम्ही सांगितले होते आज यावयाला म्हणून आलो.' वामनराव बोलू लागले. 'हे पाहा, वामनराव! दहा मण भात होते, ते सारे विकले त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या, त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून पंचवीस रूपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेविले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी चार शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणावे. हळूहळू सारा फडशा पाडू, बेबाक करू, जरा मुले मोठी होऊ देत- मिळवती होऊ देत- एक यंदा प्रीव्हिअसमध्ये गेला आहे. हे पाहा, वामनराव, शेणातले किडे का शेणातच राहतात? तेही बाहेर पडतात.' माझे वडील अजीजी करून सांगत होते.
द्यायला लागतात, जवळ नसतील. नसेल केले. तेथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचे. श्याम! उगी. हो! संध्या झाली का? आरती करा. मी पाने वाढते. भुकेलेला असशील' आई अमृतमय वाणीने बोलते होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता.
आरती झाली. पाने वाढली. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले. मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता; त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही, असे बघून माझ्या