'ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय येथून हलणार नाही. हे नवीन घर बांधलेत, त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकविण्यासाठी तुमच्यापाशी पैसे आहेत; फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. अहो! सावकारांचा वसूल आला नाही, तर आम्हांस तरी पगार कोठून मिळणार? ते काही नाही. आम्हालाही मालकासमोर उभे राहावयास शरम वाटते. रूपये द्या.' वामनराव रागाने, बेमुवर्तखोरपणे बोलत होता. तो तरी काय करील? तोही गुलामच!
'वामनराव! काय सांगू तुम्हांला? घर ते काय? अहो केंबळी घर. मापाच्या भिंती! तिचा आग्रह म्हणून बांधली मठी, उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसे घर बांधावयासही तिच्या हातांतल्या पाटल्या विकाव्या लागल्या!' वडील शरमिंदे होऊन सांगत होते.
वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळयातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवत नव्हता.
पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्या वेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते, तर चटकन पाणीच बाहेर आले असते. जणू अश्रुमय मी बनलो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील; परंतु त्या रात्री ते जे दही दिले, त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती ती पैशाअडक्यात नव्हती.
आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली;