जा. जातेस की नाही?' माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो ना करता करता पंचवीस रूपये घेऊन कारकून निघून गेला.

वडील घरात आले. 'तुम्हां बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हांला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो! त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे, एवढेच तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढवून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते? गोडीगुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी ओढाताण होत असेल त्याची तुम्हाला काय कल्पना?' वडील आईला बोलू लागले.

'पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीसफिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव, आपणही


369 of 468

तुझी चौघडी घाल. चल, मला निजव; थोडा वेळ थोपट. राहू दे पोतेरे.' मुलापुढे आईचे काय चालणार? मी जणू त्या वेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या.

पहाटेची वेळ। दूर कोंबडा आरवे

परी बाळा झोपी जावे। लहान तू ॥ अंगाई॥

पहाटेची वेळ। वाजू लागती रहाट

बाळा तू रे पाळण्यात। झोप घेई ॥ अंगाई॥

पहाटेची वेळ। का का करितो कावळा

झोपे परि माझ्या बाळा। उठू नको ॥ अंगाई॥

पहाटेची वेळ। कामाची आहे घाई

बाळा, तू झोप घेई। आई म्हणे ॥अंगाई॥


369 of 773