मोलमजुरी करू. मथुरीच्या तिकडे राहावयास जाऊ. मजूरसुध्दा मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाहीत. चला, आपण मोलमजुरी करू, धरित्रीवर निजू, झर्यााचे पाणी पिऊ, झाडाचा पाला ओरबाडून खाऊ. चला...' आई भावनाविवश झाली होती.
'बोलणे सोपे करणे कठीण. दुपारची वेळ झाली, म्हणजे समजेल सारे!' असे बोलून वडील बाहेर गेले.
धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, 'आई ! रडू नकोस. तू रडलीस, म्हणजे आम्हांला रडू येते. आई! तू सांगशील, ते काम आम्ही करू. रडू नकोस, आई!....'
लहान मुले मोठया आईची समजूत घालीत होती! फुले झाडाला आधार देत होती! करूण असे ते दृश्य होते.
रात्र तेंहतिसावी: गरिबांचे मनोरथ
श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दु:खी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला!
"श्याम!
मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले, 'आई! मी आपला निघून जातो. मी येथे राहात नाही. मी आलो, तर भाऊ किती रागे भरले! ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे.'
आई म्हणाली, 'असे नको हो, श्याम करू. हे चांगले का? अरे, ते बोलले तरी त्यांच्यात मनात का असते? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील, म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे. तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढविले, तर