तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत?' रामने विचारले.
"राम! आपल्या देशात अपरंपार दु:ख, दैन्य, दारिद्रय आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते, रे! हे दु:ख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे! जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग! लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत! कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेले! पारतंत्र्य सर्वभक्षक आहे. सर्वसंहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही; शोक आहे. आनंद नाही; कृतघ्नता आहे, कृतज्ञता
दोन शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून, स्वत: फाटकी धोतरे नेसून, ते पैसे देतात. ते तू या दोन शब्दांमुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे, म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात, म्हणून बोलले. उद्या मोठे झालात, तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे, म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का? आईबापांच्या