मनोरथ, किती स्वप्ने! मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन! आई! सार्याव आशांवर पाणी ओतावयाचे? सारे मनोरथ मातीत लोटावयाचे?' मी जणू कवी होऊनच बोलत होतो; भावना मला बोलवीत होती, माझ्या ओठांना नाचवीत होती.
'श्याम! गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळया किडीच खाऊन टाकतात!' आई म्हणाली.
आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत? तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे, असे तुला वाटते! मी मोठा व्हावे, असे तुला नाही वाटत?' मी आईला विचारले.
'माझ्या मुलाने मोठे व्हावे; परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दु:ख देऊन मोठे होऊ नये. स्वत:च्या पायांवर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे; पित्यावर विसंबून रहावयाचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे.' आई म्हणाली.
ही हळदीची पानेसुध्दा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते? श्याम, चुलीखाली थोडया घाल. मी पण अंघोळ करून देवळास जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर पंधरा दिवशी गणपतीवर एकादशणी करीत असतो.'
वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम! माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा, म्हणून ते देवास आळवीत! मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडावयास जाऊन तंवसे घेऊन आले? त्यांच्यावर