दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता, तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो! इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळले की भुर्रकन आईजवळ उडून येत होते; परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारीसुध्दा घरी जावयाचा. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठया सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे-जाणे थोडेच होणार! प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार ! मला दहा रूपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो; पुढे आईबापांस सुख देता यावे म्हणून जात होतो; आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो; हाच एक विचार मला धीर देत होता. डोळयांतील पाण्याला थांबवीत होता. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण? तिचे पाय सुट्टीत कोण
काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता.
'श्यामला वाढ ग आणखी पातोळा. माझा म्हणून एक वाढ.' वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हांस कधीही केली नाही. दहा उठाबशा काढ, अंगणातले गवत बेणून टाक, त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल, देवांना दहा नमस्कार, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखादे वेळेस रागाने बोलत; परंतु मारीत नसत.
आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली.