देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम! तुमच्यासाठीच जगत्ये रे-' असे म्हणून आईने डोळयांना पदर लावला.
आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. 'देवाचे काम करावयास लाजू नको; पाप करण्याची लाज धर-' थोर शब्द! आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल ह्या शब्दांची किती जरूरी आहे? देवाच्या कामाची देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची, आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी-सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती.
मी आईच्या पाया पडलो व म्हटले, 'आई! जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणो. मी जाईन. पुंडलीक आईबापाची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता
सारखा प्रदक्षिणा घालीत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरूवात केली:
"माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी! खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो ! खरेच ती जगाची बयो होती; आई होती.