का? नाना! तुम्ही येत जा, प्रेमाने आम्हांला भेटावयास येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना?' आईचा गळा दाटून आला.
'नाही, मी आता येणार नाही, जेथे आपल्या शब्दाला मान नाही, तेथे कशाला जा?' असे म्हणत नाना निघून गेले.
'नाना! तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले. काय करायचे? जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का? म्हणजे शांत वाटेल.' आईवडिलांना म्हणाली.
'या कपाळकरंटयाच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आत जा. मला एकटाच पडू दे.' वडील त्राग्याने म्हणाले.
गरीब बिचारी आई! ती उठून गेली. धाकटा पुरूषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरूण सरसावून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे? तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता. आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते.
आईला राग आला. आता भाजणी कशी होणार? जाते कसे ती एकटी ओढणार?
आई आजीला म्हणाली, 'तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल?'
'मी काय पत्कर घेतला आहे, की काय, तुझ्या कामाचा? वाहवा, ग! म्हणे, भाजणी कशी होईल? माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस.' आजी मोठयाने बोलू लागली.
आईलाही चेव आला, संतापली ती. 'म्हणे, ओढवत नाही! तुम्हांला लोकांकडे काम करायला शक्ती आहे. घरी तेवढे हात मोडतात! सार्याथ गावाने चांगले म्हणायला हवे ना; परंतु येथे हात लावतील तर शपथ!