वडील शौचास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली, 'म्हटलं, श्याम आला, हो, आपला, आताच आला!' ते पाय धुऊन घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. 'श्याम! गणपतीवर आवर्तने करीत होतो. आलास शेवटी, खुशाल आहेस ना? सदानंद गेला!' असे म्हणून त्यांनी डोळयांना उपरणे लावले.
'नीज जरा अंथरूणावर, बाहेर थंडी आहे, नीज.' आई मला म्हणाली. मी कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरूणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे, असे मला वाटत होते. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरूणावर निजणे, तिच्या पांघरूणात निजणे, ते अजून मला आठवते आहे. किती तरी वेळा रात्री अंथरूणात असताना 'मी माझ्या आईच्या कुशीत आहे' हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत, असे कितीदा तरी मला वाटते व मी गहिवरतो.
आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते. परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे, घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते, ते शांत होण्यासाठी येते. रोग येतात. ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते, ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी येते.
माझी आई शांत झाली. बोलेनाशी झाली. आजीचे थोडा वेळ सुरूच होते मधून मधून. 'लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात