घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरूषोत्तम घरातील व गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली, ते त्याला मी सांगितले, कोकणात कोंबडीच्या अंडयाला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, 'तुला कवठ आवडते, रे? मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळयात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर, सारे त्याला सांगत होतो. पुरूषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसार्याीला गेला असता. साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टीत असे काही दिवस गेले.
आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडीलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही. म्हणून हात हलवीत परत आलो, असे त्यांना वाटू लागले.
मी वाटेल तेथे काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलावतात, तर तुला का मत्सर?'
आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचेही बंद झाले. थोडया वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, 'मी चुकल्ये, हो बोलू नये ते बोलल्ये. तुम्हांला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठया! परंतु अलीकडे या सार्या दगदगीने, काळजीने व दुखण्यांनी मी अगदीच वेंगल्ये आहे. मला नाही राहात मग सुमार. भान जणू मी विसरत्ये. मी मग कोणाला बोलत्ये, याची शुध्दही राहात नाही. मेले, असले जगून तरी काय करायचे? चुकल्ये हो.'