'त्या वेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरे झाले असते. या दिवसांत नोकरी तरी कोठे आहे? परंतु तुम्हां मायलेकरांना पसंत पडले नाही.' वडील पुन्हा म्हणाले.
'पण इतक्यांत त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल. तो येथून जाईल, हो. तो घरबशा होणार नाही, खायला काळ व भुईला भार होणार नाही.' आई म्हणाली.
'तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात. शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल, म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल.' वडील आपलेच म्हणणे पुढे चालवीत होते.
शेवटी माझ्याने राहवेना; मी अंथरूणात उठून बसलो व म्हणालो, 'भाऊ! मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो. माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही, तर येथे कशाला राहू? मी केवळ खाण्यासाठी व माशा मारीत बसण्यासाठी येथे आलो नाही.
करून; म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार.' आई गोड बोलली.
अलीकडे घरात चहाची पूड असे. कधी कोणी आजारी असले, कोणाला दमा लागला, तर आई करून देई. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खर्यांआकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, 'जात्ये, ग येश्वदे. रागावू बिगावू नकोस, हो. मनात धरू नकोस.'
"तुम्हीच नका धरू मनात, म्हणजे झाले. कशा झाल्यात तरी तुम्ही वयाने मोठया. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी, माझे बोलणे पोटात घालीत जा.' आई म्हणाली.