व दिवस उजाडला. मी आईला म्हटले, 'माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही, तर महिन्याभराने जावेच लागणार ना? तू परवानगी दे.'
शेवटी आईने संमती दिली. दुसर्याआवर स्वत:ची इच्छा ती लादीत नसे. शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते. स्वातंत्र्य देणारे होते.'
वडिलांवर रागावून मी परत जावयास निघालो. आईला रडे आवरेना. एक पोटाचा गोळा प्लेगने बळी घेतला होता. दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार! बापलेकांच्या झगडयात ती गाय मात्र रडविली जात होती.
मी आईच्या पाया पडलो. वडिलांचे पाय धरले. उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला.
मी गाडीत बसलो. गडयांनो! आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन! त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तीची भस्ममय मूर्तीच शेवटी स्मशानात मी
सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकटया भावांना एकेक नवीन सदरा वडिलांनी केला. परंतु त्यांच्या नेसूची धोतरे मात्र फार फाटली होती. आईने ती सतरांदा शिवली होती. सतरा ठिकाणी शिवली होती. ती आता इतकी विरली होती, की शिवणे कठीण झाले होते. आम्हां मुलांना त्यांची नवीन कपडे केले; परंतु स्वत:ला नवीन धोतरे घेतली नाहीत.
आईला वाईट वाटत होते. परंतु ती काय करणार? तिच्याजवळ थोडेच पैसे होते? किती तरी दिवसांत तिला सुध्दा नवीन लुगडे मिळाले नव्हते. परंतु तिला स्वत:चे इतके वाईट