'आई! सारी मुले मला चिडवतात! का ग असे? म्हणतात, 'तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार.' आई! सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणांस येथून बाहेर काढणार का ग? काय ग झाले? असे आईला विचारू लागला.
'बाळ! देवाची मर्जी; मी तरी काय सांगू तुला?' असे म्हणून पडल्यापडल्याच या पोटच्या गोळयाला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. मायलेकरे शोकसागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, 'जा बाळ; हातपाय धू; आज राधाताईकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलावले आहे.'
लहान भाऊ, त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला.
त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले. देवाची पूजा केली. लाज वाटत होती, तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात
झाल्यापासून भुत्ये भिक्षेसाठी येत होते. अंबाबाईची गाणी म्हणत होते, पै-पैसा, पोहे, करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो. वडिलांनी आम्हांला हाक मारली व देवांचा नैवेद्य त्यांनी आम्हांला दिला. रोजचे सूर्याचे नमस्कार घालून ते देवळात गेले. देवळातून थोडया वेळाने ते परत आले.
'माझे धोतर, ग, कुठे आहे आज? दिसत नाही ते.' त्यांनी आईला विचारले.
'त्यांची दोन अंगपुसणी केली. किती फाटले होते ते?' आई म्हणाली.
'अग, मग नेसू काय आज? आणखी महिनाभर ते गेले असते.' ते म्हणाले.
'त्याचा