त्या दिवशी कुत्रेही विचारीत नव्हते! ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होती. जेथे फुले वेचली, तेथेच शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसेबसे अब्रूने दिवस काढले होते; परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यावयाची होती. मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दर्याे, आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छीत होता. संपूर्ण सुख व संपूर्ण दु:ख दोन्ही कळली पाहिजेत. अमावस्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोटया आईला करून देत होती.
दुपारी पोलिस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकविली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच. मणिमंगळसूत्र काय ते राहिले होते. होते नव्हते, ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले. सील केले. आम्हांला राहावयाला दोन खोल्या मोठया कृपेने देण्यात आल्या.
अंत तरी किती पाहावयाचा? ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती व वाईट वाटत होते.' आई म्हणाली.
'अग, मला नेसायला सुध्दा वाटत होती. परंतु करायचे काय? लाज वाटली, म्हणून वरून काही पैसे पडत नाहीत.' ते म्हणाले.
'हे धोतर नेसा आज.' आईने धोतर पुढे केले.
'हे कोठले? कोणी आणले?' त्यांनी विचारले.
'अमृतशेठकडून मी आणविले.' आई म्हणाली.
'अग, तो मला उधार देत नव्हता. मी त्याच्याजवळ मागितले का नाही? परंतु तो उधार देईना. 'माझी पूर्वीची बाकीच कशी